Friday, October 25, 2024

स्त्री प्रजननसंस्था खालील प्रकारे

 श्रोणिगुहेत दोन्ही बाजूंच्या बीजांडवाहिन्या आणि योनी यांच्या मधे गर्भाशय असते. ही स्नायूंची जाड पिशवी असून आतील पोकळी अरूंद फटीसारखी आणि त्रिकोनी असते. त्याच्या दोन टोकांना बीजांडवाहिन्या जोडलेल्या असतात आणि त्या गर्भाशयपोकळीत उघडतात. त्याच्या खालच्या निमुळत्या ग्रीवेतून गर्भाशयाचे तोंड योनिमार्गात उघडते.

मासिक पाळीच्या चक्रात गर्भाशयाच्या अंतःत्वचेमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांच्या प्रभावाखाली दरमहा बदल होतात. ते फलित बीजांडाच्या रोपणास व पोषणास योग्य असे असतात. फलित बीजांडाचे (गर्भाचे) रोपण झाल्यावर (गर्भधारणा) त्याची पूर्ण वाढ होईपर्यंत गर्भ सुरक्षित ठेवणे आणि गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर प्रसूती ही गर्भाशयाची महत्त्वाची कामे आहेत.

बीजांडाचे फलन न झाल्यास ते, अंतःत्वचेचा वरील थर व थोडे रक्त मासिक पाळीच्या रक्तस्रावाच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकले जातात व मासिक पाळीचे नवीन चक्र सुरू होते.

गर्भाशय आणि बाह्य जननेंद्रीये यामधील स्थितीस्थापक तंतुस्नायुमय नलिकेस योनी म्हणतात. तिचे गर्भाशयाकडील तोंड गर्भाशयग्रीवेला सर्व बाजूनी चिकटलेले असते व गर्भाशयमुख तिच्यात उघडते. तिचे दुसरे तोंड बाह्य जननेंद्रीयात मूत्रमार्गाखाली उघडते. स्त्रियांमध्ये मूत्रमार्ग आणि योनी मार्ग (संभोगाचा मार्ग) वेगवेगळे असतात.  

कामोत्तेजित अवस्थेत बाह्य जननेंद्रीये व योनीत तयार होणारे स्राव संभोगाच्या वेळी योनीत शिश्नाचा प्रवेश सुलभ करवितात. त्यावेळी योनी शिश्नास सामावून घेते व क्षेपण झालेले वीर्य साठवून ठेवते. वीर्यातील शुक्रजन्तू तेथून गर्भाशयमुखामार्गे गर्भाशयात प्रवेश करतात.

तसेच प्रसूतीच्या वेळी गर्भाशयातून बाळ योनीत प्रवेश करते व योनीमुखाद्वारे जन्म घेते.

याप्रमाणे संभोगाचा आणि प्रसूतीचा मार्ग म्हणून योनी काम करते.

पुरुषाप्रमाणेच स्त्रीमध्येही अंतस्त्रावी ग्रंथींतून स्रवणाऱ्या संप्रेरकांच्या समन्वयाने जननसंस्थेचे नियंत्रण होते. बाल्यावस्थेत जननेंद्रियांची वाढ होत नाही. पण वय वर्षे १०-११ च्या (मुलांपेक्षा एक वर्ष आधी) सुमारास मेंदूमधील अग्र पोषग्रंथीमधून (Pituitary gland) पुटक उद्दीपक संप्रेरक (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन - Follicle-stimulating hormone) व पीतपिंडकारी संप्रेरक (ल्युटिनायझिंग हार्मोन - Luteinizing hormone) स्रवण्यास सुरुवात होते व त्यामुळे पौगंडावस्थेची सुरुवात होते.

पुटक उद्दीपक संप्रेरकाच्या प्रभावामुळे बीजांडंकोशात पुटकनिर्मिती व त्यामध्ये बीजांड निर्मिती सुरू होते. तसेच पुटकातील पेशींतून ईस्ट्रोजेन या अंतःस्रावाचीही निर्मिती सुरू होते. पुटक व बीजांडाची पुरेशी वाढ झाल्यावर पीतपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे पुटक फुटते व बीजांड मुक्त होते. त्यानंतर या संप्रेरकाच्या प्रभावामुळे फुटलेल्या पुटकात पीतपिंडाची निर्मिती व वाढ होते. पीतपिंडातून प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक स्रवते.

याशिवाय मुख्यतः दुय्यम लैंगिक चिन्हांच्या विकासाला अवटु व अधिवृक्क या अंतःस्रावी ग्रंथीही सहाय्य करतात.

बाह्य स्त्री जननेंद्रिये

संपादन

ही स्त्रीची संभोगाची इंद्रिये असून संभोगाचे वेळी शिश्नाचा योनीत प्रवेश होण्यास मदत करणे आणि अंतर्गत जननेंद्रीयांचे संसर्गापासून रक्षण करणे हे त्यांचे कार्य आहे. स्त्रीमधील बाह्य जननेंद्रीयांमध्ये योनिमुख आणि त्याभोवती असणाऱ्या भगप्रकोष्ठ, बृहत्भगोष्ठ, लघुभगोष्ठ,भगशिश्न आणि प्रघ्राणग्रंथी या अवयवांचा समावेश होतो. भगशिश्न हे पुरुषाच्या शिश्नाशी समजात असून उत्थानक्षम असते. पुरुषाप्रमाणे मूत्रमार्गाशी याचा संबंध येत नाही. स्त्रीचा मूत्रमार्ग स्वतंत्रपणे बाह्य जननेंद्रियात उघडतो. बृहत्भगोष्ठ आणि लघुभगोष्ठ त्वचेच्या घड्यानी बनलेले असते. हे अवयव उत्थानक्षम व अतीसंवेदनक्षम असल्याने या भागास रक्तवाहिन्यांचा आणि चेतातंतूंचा भरपूर पुरवठा असतो.

प्रघ्राण ग्रंथी (बार्थोलिन ग्रंथी - Bartholin's gland): योनिमुखाच्या दोन्ही बाजूंस या ग्रंथी असून त्यांच्या नलिका लघुभगोष्ठांच्या आत योनिमुखाच्या दोन्ही बाजूंस उघडतात. पुरुषाच्या कंदमूत्रमार्ग ग्रंथींशी (Bulbourethral glands/Cowper's gland) या समजात असल्या तरी त्यांचे स्थान वेगळे आहे. संभोगाच्या वेळी किंवा उत्तेजित झाल्यानंतर या ग्रंथीमधून पाझरलेला स्राव योनिमार्गामध्ये स्नेहनाचे कार्य करतो.

No comments:

Post a Comment

गर्भपात

  लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा नैसर्गिकरित्या झालेला गर्भपात...