बालकांच्या आरोग्याच्या सामान्य समस्या
बालकांच्या आरोग्याच्या सामान्य समस्या
नवजात अर्भकांना होणारी कावीळ
लक्षणे
उपचार
काही महत्वाच्या गोष्टी
जन्मावेळी वजन कमी असणे
संक्रामक रोग
बालकांच्या आरोग्याची निगा
गर्भाची काळजी
नवजात बाळाची काळजी
अर्भकं, बालकं आणि शालेय-पूर्व मुलांची निगा
वाढ आणि विकास यांच्यावर देखरेख ठेवणे
बालकाची वाढ
वाढीची पध्दत
बाळाचा विकास
नवजात अर्भकांना होणारी कावीळ
नवजात अर्भकांना होणार्या काविळीची व्याख्या
पित्तामुळे व बिलिरुबिनमुळे बाळाची त्वचा तसेच डोळ्यांतील पांढरा भाग (स्क्लेरे) पिवळा पडणे. नवजात अर्भकांना काही प्रमाणात कावीळ होणे सर्वसामान्य असते. ही कावीळ होते कारण लाल रक्तपेशींच्या विभाजनामुळे रक्तात बिलिरुबिन सोडले जाते आणि नवजात अर्भकाची लिवर म्हणजे यकृत सुरुवातीस पुरेशा गतीने काम करीत नसल्याने चयापचय क्रियेद्वारे बिलिरुबिन लघवीद्वारे सोडण्याचे काम कार्यक्षमतेने करू शकत नाही. ही कावीळ जन्मानंतरच्या दुसर्या ते पाचव्या दिवशी आढळून येते आणि कालांतराने नाहीशी होते.
नवजात अर्भकांच्या ह्या काविळीस निओनॅटल हायपरबिलिरुबेनेमिया किंवा फिजिऑलॉजिक जॉन्डिस असेही म्हणतात.
नवजात अर्भकांच्या ह्या काविळीत काळजी करण्याजोगे फारसे काही नसते. ही कावीळ जन्मानंतरच्या दुसर्या ते पाचव्या दिवशी आढळून येते. पूर्ण दिवसांच्या बाळामध्ये ती सुमारे ८ दिवस टिकते तर अपुर्या दिवसांच्या बाळांमध्ये १४ दिवस.
ही कावीळ होते कारण लाल रक्तपेशींच्या विभाजनामुळे रक्तात पिवळ्या रंगाचे बिलिरुबिन हे द्रव्य सोडले जाते आणि नवजात अर्भकाची लिवर म्हणजे यकृत सुरुवातीस पुरेशा गतीने काम करीत नसल्याने चयापचय क्रियेद्वारे बिलिरुबिन लघवीद्वारे सोडण्याचे काम कार्यक्षमतेने करू शकत नाही. हा पिवळा रंग साठत राहतो आणि कालांतराने त्वचेवर दिसू लागतो. त्यामुळे दोन दिवसंचे अर्भक पिवळ्या रंगाचे दिसल्यास त्याविषयी फार चिंता करू नका.
लक्षणे
त्वचा पिवळी पडणे
डोळ्यांतील पांढरा भाग व नखांची मुळे पिवळी होणे
बाळ नेहमीपेक्षा जास्त काळ झोपते.
उपचार
सौम्य कावीळ १० दिवसांत नाहीशी होते. मात्र तिची एकंदर तीव्रता कमी करण्यासाठी हे उपचार करणे आवश्यक आहे -
बाळाला शक्यतितके आईचे दूध द्या.
बाळाला अप्रत्यक्षपणे सूर्यप्रकाश मिळू द्या. पातळ कापडाचा पडदा असलेल्या खिडकीजवळ बाळाचा पाळणा किंवा पलंग ठेवा.
बिलिरुबिनचे विभाजन करण्यासाठी बाळाला ‘लाइट द्या’ म्हणजेच प्रकाशऔषधीचे उपचार करा. ह्यासाठी साधारणपणे निळा दिवा वापरतात. हिरवा दिवा बिलिरुबिनच्या विभाजनास अधिक चांगला असतो परंतु त्या प्रकाशात बाळ अगदीच आजारी दिसत असल्याने कोणी तो फारसा वापरीत नाही.
गंभीर स्थितीमध्ये मात्र रक्त बदलावे लागते (ब्लड ट्रांस्फ्यूजन).
यकृताने जास्त कार्यक्षमता दाखवून पिवळा रंग दूर करावा ह्यासाठी विशिष्ट औषधे देणे
टीप - कावीळ २ आठवड्यांपेक्षा जास्त टिकल्यास मात्र बाळाच्या मेटॅबोलिक स्क्रीनची गॅलेक्टोसेमिया आणि कंजेंटियल हायपोथायरॉडिझमसाठी तपासणी करा. कुटुंबियांमध्ये रोगाचा काही पूर्वइतिहास आहे का हे तपासा. बाळाचे वजन कसे वाढते आहे ते पहा. बाळाच्या शी चा रंग तपासा.
काही महत्वाच्या गोष्टी
एका पाहणीत असे दिसले आहे की नवजात अर्भकांमधील ही कावीळ होण्याचे प्रमाण मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त असते. परंतु ह्याचा बिलिरुबिन तयार होण्याच्या प्रमाणाशी काही संबंध नाही कारण ते प्रमाण दोघांमध्ये सारखेच असते.
संशोधक म्हणतात की बाळाला प्रखर सूर्यप्रकाश दिला गेल्यास त्याच्या त्वचेवर तीळ किंवा चामखीळ उठू शकतात. डॉक्टरी भाषेत ह्यांना मेलानोसायटिक नेवी असे म्हणतात. म्हणूनच बाळाला लाइट देताना काळजी घेण्याचा सल्ला पालकांना दिला जातो.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने असे सिद्ध केले की त्वचा पिवळी करणारे बिलिरुबिन हे द्रव्य वास्तविक शक्तिशालि अॅन्टिऑक्सिडंट आहे आणि ते बाळाच्या पेशींना सुरक्षित ठेवते. म्हणजेच ही कावीळ पेशींना संरक्षण देणारी भिंतच आहे. अर्थात् कविळीवरचे उपचार केले गेलेच पाहिजेत.
जन्मानंतरच्या काही दिवसांत बाळाला पाणी पाजू नका, त्यामुळे कावीळ वाढते. आईचे दूध देणे सर्वोत्तम.
जन्मावेळी वजन कमी असणे
चांगला पोषाहार असलेल्या मातांना झालेल्या बाळांचे जन्मतः वजन सामान्यतः ३-५ किलो असते. परंतु भारतीय नवजात मुलांचे सरासरी वजन २.७ ते २.९ किलो असते. जन्माच्या एक तासाच्या आत बाळाचं वजन नोंदवणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे त्याची वाढ आणि जगण्याची शक्यता यांचं निदान करता येतं. जगभरात जन्मावेळी वजन कमी असण्याची व्याख्या २.५ किलोपेक्षा कमी असणं अशी केली जाते ( २.४९९९ पर्यंत आणि त्यासह). हे वजन शक्यतो त्याच्या जन्माच्या एक तासाच्या आत आणि जन्मानंतर त्याच्या वजनात काही कपात होण्याआधी नोंदवलेलं असावं. बाळ हे पूर्ण कालावधीचं किंवा मुदतीपूर्वी जन्मलेलं असू शकतं. जन्मावेळी वजन कमी असणा-या बाळांचे दोन प्रकार आहेत.
मुदतीपूर्वी जन्मलेली बाळं: ज्या बाळांचा जन्म मुदतीपूर्वी किंवा वेळेपूर्वी म्हणजेच, गर्भधारणेच्या ३७ आठवड्यांच्या काळापूर्वी झालेली बाळं या प्रकारात येतात. त्यांची गर्भावस्थेतील वाढ ही सामान्य असू शकते. म्हणजेच, त्यांचं वजन, लांबी आणि विकास हे सामान्य पातळीत असतात आणि नवजात अवस्थेत असताना आणि त्यानंतर योग्य काळजी घेतली तर दुस-या त्यांचा तिस-या वर्षापर्यंत चांगला विकास होतो. मुदतीपूर्वी झालेली प्रसुती ही एकापेक्षा अधिक गर्भ असणे, तीव्र संक्रमण, विषबाधा, अल्पवयात गर्भधारणा, अंगमेहनतीची कामं इत्यादी कारणांमुळं होते. अनेक प्रकरणांमध्ये, त्याची कारणं कळू शकत नाहीत.
मुदतीच्या तुलनेनं लहान (एसएफडी): अशी बाळं ही मुदत पूर्ण करुन किंवा मुदतीपूर्वी जन्मलेली असतात. त्यांचं वजन हे त्यांच्या गर्भावस्थेतील काळाच्या १० टक्क्यांहून कमी असतं. विकसनशील देशांमधील बहुतांश कमी वजनाची बाळं ही या प्रकारात मोडतात. त्याची अनेक कारणं आहेत. त्यामधे, माता, गर्भ आणि नाळ यांच्याशी निगडीत घटक आहेत. मातेशी निगडीत घटकांमधे, कुपोषण, तीव्र अशक्तपणा, वय लहान असणं, बांधा लहान असणं, एकापेक्षा अधिक गर्भ असणं, लागोपाठ मुलांचा जन्म होणं, उच्च रक्तदाब, विषबाधा आणि हिवताप यांचा समावेश होतो. यापैकी बहुतांश कारणं ही महिलांचा आणि एकंदर लोकांचा निम्न सामाजिक-आर्थिक आणि शिक्षणाचा दर्जा यांच्याशी निगडीत असतात. गर्भाशी निगडीत घटक असे आहेतः- अनेक गर्भ असणं, गर्भाशयात संक्रमण, गर्भाची विकृती आणि जनुकीय विकृती. नाळेशी निगडीत घटकांमधे, नाळेची विकृती आणि अपुरेपणा.
जन्मावेळी वजन कमी असणं ही एक जगभरातील समस्या आहे. परंतु त्याचं प्रमाण हे अतिप्रगत देशांमधे ४ टक्के ते विकसनशील देशांमधे ३० टक्के इतकं असतं. बहुतांश अशी बाळं ही मुदतीच्या तुलनेनं लहान असतात. त्यातून महिलांचं निकृष्ट आरोग्य आणि सामाजिक-आर्थिक दर्जा दिसून येतो.
जन्मावेळी वजन कमी राहणे टाळण्यासाठी पुढील उपाय केले जातातः
प्रसुतीपूर्वी नियमित चांगली निगा घेणे
सर्व गर्भवती महिलांची नोंदणी लवकर करणे आणि धोका असलेल्या महिला शोधून काढणे
आहाराचं प्रमाण सुधारणे – चांगल्या संयुक्त आहारासाठी प्रोत्साहन देणे, पूरक आहार देणे, लोह आणि फॉलीक असिडच्या गोळ्या वाटणे.
मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादीसारख्या असंक्रामक रोगांचं निदान आणि उपचार.
धूम्रपान, स्वतःहून औषधं घेणे आणि भोंदू वैद्याकडून उपचार घेणं टाळणे.
लहान कुटुंब ठेवणे, दोन मुलांत योग्य अंतर ठेवणे आणि गर्भधारणेचं नियोजन.
महिलांच्या सामाजिक-आर्थिक दर्जा सुधारणे.
लिंगभेद टाळण्याचा प्रचार करणे
जन्मावेळी वजन कमी असण्यावर उपचार आणि निगाः उपचाराचं नियोजन आणि निगा पुढीलप्रमाणं आखण्यात आली आहेः
संस्थात्मक स्तरः किलोपेक्षा कमी वजन असलेल्या बाळांना रुग्णालयांच्या दक्षता विभागात ठेवून त्यांचा ऑक्सिजनचा पुरवठा, तापमान आणि आर्द्रता नियंत्रित केली जाते. त्यामुळं अशा बाळांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करणं गरजेचं असतं.
घरगुती स्तरावरः २-२.५ किलो वजनाच्या बाळांची देखभाल ही आरोग्य कार्यकर्त्यांच्या देखरेख आणि मार्गदर्शनाखाली घरगुती स्तरावर करता येते. बाळाला उब, अन्न पुरेसं आणि वारंवार दिलं जाणं आणि संक्रमण टाळण्याची निगा देण्याची खात्री करावी. त्यांच्या वजनातून समाधानकारक प्रगती दिसून आली पाहिजे.
कुपोषणः कुपोषण हे अपु-या आणि असंतुलीत आहारामुळं होतं. प्रथिनांच्या उर्जेचं कुपोषण ही मोठी समस्या आहे. जन्मावेळी वजन कमी असणं ही एक जागतिक समस्या आहे. राष्ट्रीय पोषाहार संस्थेच्या १९९२-९३ च्या अहवालानुसार, कुपोषणाशी निगडीत सर्वात धोक्याच्या स्थितीत असणारा गट हा सहा महिने ते दोन वर्षे या काळातील असतो.
त्यामुळे बाळाची प्रतिकार शक्ती कमी झाल्यानं बाळ संक्रमणांला प्रवण होतं. कुपोषण टाळणं महत्वाचं आहे कारण त्यामुळं वाढ आणि विकास खुंटतो, पोषाहाराच्या कमतरतेच्या आणि त्यासंबंधीच्या समस्या होतात आणि त्यासाठी खर्चिक उपचार करावे लागतात.
बाळ जन्मल्यानंतर ५-६ महिने त्याच्या मागणीनुसार केवळ स्तनपान करवणं.
गाईचं दूध, फळं, मऊ शिजवलेला भात, अन्य कडधान्यं आणि डाळी यांसारखं पोषक घटकांनी समृध्द असलेलं अन्न ५-६ महिन्यानंतर स्तनपानाला पूरक आहार म्हणून देण्यात यावं.
कडधान्यं, डाळी, भाज्या, फळं, दूध आणि दुधाचे पदार्थ यांचा समावेश असलेला संपूर्ण आहार.
नवजात मुलींना योग्य आणि पुरेसा आहार मिळण्याची खात्री करणं.
पोषणाची कोणतीही कमतरता असल्यास ती लवकर शोधून काढणं आणि त्याच्यावर योग्य उपचार करणं.
संक्रामक रोग
संक्रामक रोग मोठ्या संख्येनं असून ते मुलांमधे सामान्यतः आढळतात तसंच त्यामुळं त्यांच्या मृत्युला कारण बनतं. त्यामधे अतिसार, तीव्र श्वसानाचं संक्रमण, कांजिण्या, डांग्या खोकला, घटसर्प, पोलियो, धनुर्वात आणि क्षयरोग यांचा समावेश होतो. १९९७ च्या आकडेवारीनुसार, अतिसाराशी निगडीत समस्यांमुळं विकसनशील देशांमधे पाच वर्षांखालील १९ टक्के बालकं दगावतात, त्यापैकी १३ बालकं एकट्या पोलिओमुळे मरतात.
अपघात आणि विषबाधाः अपघात आणि विषबाधा ही मुलांची एक सामान्य समस्या आहे कारण घरी, रस्त्यावर, शाळा इत्यादी ठिकाणी ते यांना बळी पडू शकतात. त्यांना भाजल्याच्या जखमा होतात, पाण्यात बुडतात, विषबाधा होते, इलेक्ट्रीक शॉक बसतो, रस्त्यावर अपघात होतात इत्यादी.
बालकांच्या आरोग्याची निगा
बाळाच्या जन्माच्या आधीपासून ते प्रत्यक्ष जन्मापर्यंत आणि त्यानंतर वयाच्या ५व्या वर्षापर्यंत ही निगा घ्यायची असते. पाचव्या वर्षानंतर, बाळाच्या आरोग्याची काळजी ही शालेय आरोग्य कार्यक्रमाच्या चमूनं घ्यायची आहे. एमसीएच सेवांसाठी काम करणारे आरोग्यसेवक हे या शालेय आरोग्य चमूचा भाग असतील अथवा नसतील.
बाळाच्या आरोग्याची निगा ही एखाद्या मुलीच्या जन्मापासूनच सुरु होते जी पुढे भविष्यात आणखी एका बाळाची माता बनणार असते. यामधे तिचा कोणताही भेदभाव न करता तिच्या आरोग्याची काळजी घ्यायची असते. मुलींसाठीच्या आरोग्य निगेमधे, जन्मापासून २८ दिवसांपर्यंत नवजात निगा, १ महिना ते १२ महिन्यापर्यंत अर्भकाची निगा, एक वर्ष ते दोन वर्षापर्यंत आणि दोन वर्षापासून शालेयपूर्व मुलांची निगा यांचा समावेश होतो. बालकांच्या आरोग्य सेवेची उद्दीष्टं पुढीलप्रमाणं आहेतः
प्रत्येक बालकाला पुरेशी निगा आणि योग्य पोषाहार मिळणं
त्यांची वाढ आणि विकास यांच्यावर देखरेख ठेवणं, त्यातील बदल शोधून काढणं आणि त्यावर वेळीच उपचार करणं
आजारपण हे तत्काळ शोधून काढून त्यावर उपचार करणं म्हणजे तो आणखी वाढणार नाही.
प्रशिक्षित व्यक्तींद्वारे निगा
माता आणि कुटुंबातील सदस्यांना, मुलांच्या सुदृढ वाढीसाठी प्रशिक्षित करणं
बालपणातील विविध अवस्थांमधील आरोग्य निगा इथं सांगण्यात आली आहे.
गर्भाची काळजी
गर्भधारणेदरम्यान निगा घेण्याचा एक उद्देश असा आहे की एक पक्व, जिवंत आणि सुदृढ बालक जन्माला येणं. त्यामुळं जन्मानंतर निगा घेण्याचा उद्देश केवळ मातांची काळजी घेऊन त्यांची आरोग्य समस्या टाळणं हा नसून बाळाचं वजन कमी राहण्यानं उद्भवणा-या समस्या टाळणं, अर्भकाचा श्वास गुदमरणं, गर्भात जन्मजात त्रुटी इत्यादी टाळण्याचाही त्याचा उद्देश आहे.
नवजात बाळाची काळजी
नवजात बाळाची काळजी जन्मापासून ते २८ दिवसांपर्यंत घ्यायची असते. या काळातली निगा ही अत्यंत महत्वाची असते कारण नवजात बाळाच्या मृत्युची शक्यता टाळण्यासाठी त्याची मदत होते. या काळात दिली जाणारी ही निगा, प्रसुतितज्ञ, बालरोगतज्ञ, परिचारक यांचा समावेश असलेल्या चमूनं द्यायची आहे. जन्मानंतर पहिल्या आठवड्यांत द्यावयाची निगा आणि विशेषतः पहिल्या २४-४८ तासांमधील निगा ही अत्यंत महत्वाची असते कारण या काळातील हलगर्जीपणामुळं मृत्युदर वाढतो. नवजात बाळांची योग्य ती निगा घेतल्यास, ५०-६० टक्के अर्भकांचे मृत्यु टाळता येतात आणि यापैकी अर्धे मृत्यु हे त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या आठवड्यात टाळता येतात. नवजात बाळ आणि त्यानंतर त्याची घ्यावयाची निगा यांची चर्चा गर्भधारणा आणि जन्मानंतरच्या निगेसोबत याआधीच करण्यात आली आहे.
अर्भकं, बालकं आणि शालेय-पूर्व मुलांची निगा
अर्भकं, बालकं आणि शालेय-पूर्व मुलांना ५ वर्षाखालील मुलांच्या श्रेणीत टाकता येईल. वस्तुतः, या अवस्था पाच वर्षाखालील वाढ आणि विकासाच्या निश्चित अशा अवस्था आहेत. या सर्व वयोगटातील बालकांची निगा सोयीच्या दृष्टीनं एकत्रितपणे करण्यात आली आहे. ही निगा एका वयोगटातून दुस-या वयोगटात सातत्यानं घ्यावयाची आहे आणि या निगेचे घटक एकसमानच आहेत. आरोग्य केंद्र आणि दवाखान्यांमधे एकाच प्रकारच्या आरोग्य चमूतर्फे ही निगा दिली जाते.
वाढ आणि विकास यांच्यावर देखरेख ठेवणे
बालकांची वाढ आणि विकास यांच्यावर सातत्यानं देखरेख ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याद्वारे मुलाचं आरोग्य आणि पोषाहार यांचा दर्जा सूचित होतो. सामान्य वृध्दी आणि विकासात काही फारकत झाली आहे का ते शोधता येतं आणि घरगुती तसंच आरोग्य केंद्राच्या पातळीवर वेळीच उपचार करता येतात.
बालकाची वाढ
बालकाची वाढ म्हणजे त्याच्या शरीराचा आकार वाढणे जो त्याचं वजन, उंची (बाळाची लांबी), डोकं, हात आणि छातीचा घेर यांच्याद्वारे मोजला जातो. ही मोजमापं संदर्भ मानकांशी जुळवली जातात आणि ती सामान्य पातळीत आहेत की नाही (दोननं अधिक, उणेचा फरक) ते ठरवता येतो. ही मोजमापं टक्केवारीच्या हिशेबानंही जुळवून पाहता येतात. उदाहरणार्थ, ५० टक्केवारीची मर्यादा ही तिसरा टक्क्यांश समजली जाते आणि ९७ हा चौथा टक्क्यांश मानला जातो. या दोन मर्यादांच्या आत असणा-या मुलांच्या वजनाला सामान्य पातळीतील वजन समजलं जातं.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, विविध स्तरांतील लोकांचा अभ्यास करुन भारतीय मुलांसाठी संदर्भात्मक मानकं ठरवत असते. जागतिक आरोग्य संघटनेनं देखील ५ वर्षाखालील मुलांसाठी संदर्भात्मक मानंक निश्चित केली असून ती जगभरात वापरली जातात.
या वाढीच्या तक्त्याचे अनेक फायदे आहेत, त्याचा पुढीलप्रकारे फायदा होतोः
बालकाचं वजन आणि वाढ यांची नियमित नोंद ठेवणे आणि त्यात मातेचा क्रियाशील सहभाग घेणे
मुलांमधील कुपोषणाची पातळी निश्चित करणे
विशिष्ठ स्तराच्या कुपोषणानुसार शिफारसकृत कृती करणे.
नियमितपणे वजन नोंदवणे आणि प्रतिबंध तसंच कुपोषणाचं नियंत्रण यांच्या महत्वाबाबत माता तसंच आरोग्य सेवकांचं शिक्षण
बालकांमधील कुपोषणासाठी सुधारणा उपायांची परिणामकारकता तपासून पाहणे
वाढीची पध्दत
वयोगटानुसार मुलांची वाढ वेगवेगळी असते आणि प्रत्येक वयोगटातील मुलासाठी अंतर्गत आणि बाह्य घटकांनुसार ती बदलते. शरीराच्या मोजमापाच्या संदर्भात ही वाढ एक निश्चित रचना / मार्ग घेते. याची संक्षिप्त चर्चा पुढं करण्यात आली आहे. सामान्यतः, वयाच्या पहिल्या वर्षात सुदृढ आणि चांगल्या पोषित मुलांची वाढ जोमानं होते.
वजनः जवळपास सर्वच बालकांचं वजन जन्मानंतर पहिल्या ३ ते ४ दिवसांतच कमी व्हायला लागतं आणि ७-१० दिवसांनंतर पुन्हा वाढायला लागतं. वजनातील ही वाढ पहिल्या तीन दिवसांत दररोज २५-३० ग्रॅम्स असते, त्यानंतर ती कमी गतीनं होते. सामान्यतः बाळाचं वजन पाच महिन्यात जन्माच्यापेक्षा दुप्पट होतं आणि एका वर्षात तिप्पट होतं. याला अपवाद म्हणजे जन्मावेळी कमी वजन असणा-या बाळांचा.
जन्मावेळी कमी वजन असणा-या बाळांचं वजन एका वर्षात चौपट वाढू शकतं. एका वर्षानंतर, वजनातील ही वाढ फार जलद होत नाही.
अनेक मुलांचं पहिल्या पाच ते सहा महिन्यातील बाळसं हे चांगलं असतं आणि त्यावेळी वजन दुप्पटीनं वाढतं. परंतु त्यानंतर, बाळसं कमी व्हायला लागतं म्हणजेच कमी-जास्त होऊ लागतं. याचं कारण असं की, बाळासाठी केवळ स्तनपानच पुरेसं नाही. स्तनपानासोबतच याआधी चर्चा केल्यानुसार अतिरीक्त अन्नपदार्थ देण्यात यावेत.
बाळाचं वजन हे त्याच्या उंचीवर अवलंबून असतं. बाळाचं वय सामान्य पातळीत आहे की नाही ते ठरवणं महत्वाचे आहे. बाळाचं वय हे उंचीच्या तुलनेत अधिक किंवा कमी असू शकतं. उंचीच्या तुलनेत कमी वय याचा अर्थ कुपोषण झाल्याचं दर्शवतो.
उंचीः बाळाच्या वाढीचं आणखी एक मोजमाप म्हणजे उंची. नवजात बाळाची उंची ही ५० सेंटीमीटर (२० इंच) असते. पहिल्या वर्षात उंची २५ सेंटीमीटरनं वाढते, दुस-या वर्षात ती १२ सेटीमीटरनं. तिस-या, चौथ्या आणि पाचव्या वर्षात अनुक्रमे ९, ७ आणि ६ सेटीमीटरनं वाढते. उंची ही वयाच्या मानानं कमी असेल तर ते वाढ खुंटण्याचं लक्षण आहे. वयाच्या विरुध्द उंची ही कुपाषोणामुळं तत्काळ प्रभावित होत नाही. तीव्र कुपोषण झालं तर ती कमी राहते. उंची अचूकपणे नोंदवणं अत्यंत महत्वाचं आहे.
डोकं आणि छातीचा घेरः ही देखील वाढीच्या नोंदीची मोजमापं आहेत. जन्मावेळी डोक्याचा घेर हा अंदाजे ३४ सेंटीमीटर (१४ इंच) असतो. ६व्या-९व्या महिन्याच्या तुलनेत तो केवळ २ सेंटीमीटरनं जास्त असतो. या वयानंतर, छातीचा घेर वाढत जातो आणि डोक्याच्या घेरापेक्षा मोठा होत जातो. मूल हे कुपोषित असेल तर, छातीचा घेर वाढण्याची क्रिया ही ३-४ वर्षांनी उशीरा सुरु होते.
दंडाचा घेरः हे मोजमाप एकदम सोपं आणि उपयुक्त आहे. दंडाचा मधल्या भागाचा घेर हात शरीराच्या बाजूला शिथील अवस्थेत असताना मोजला जातो. मोजमापाची टेप ही हलकेच पण न हलता दंडाभोवती गुंडाळावी, दाबू नये. जन्मापासून एक वर्षापर्यंत हा घेर त्वरेनं वाढतो – ११-१२ सेंटीमीटरपर्यंत. त्यानंतर ५व्या वर्षापर्यंत, तो चांगल्या पोषित मुलांमधे अंदाजे १६-१७ सेंटीमीटर असा स्थिर राहतो. सामान्य पातळीच्या ऐंशी टक्के कमी म्हणजे अंदाजे १२.८ सेंटीमीटर मोजमाप मध्यम ते तीव्र कुपोषण दर्शवते. दंडाचा घेर मोजण्यासाठी एक रंगीत पट्टी उपलब्ध आहे.
बाळाचा विकास
बाळाचा विकास म्हणजे, त्याची बुध्दी, भावना आणी सामाजिक पैलूंच्या बाबतीत त्याची कौशल्यं आणि कार्यांचा विकास होय. या घडामोडी मानसिक आणि वर्तणुकीशी निगडीत असतात. त्यामुळं बाळाच्या वाढीची पध्दत नीट पाहणं आणि त्यांचा विकास या दोन्ही गोष्टी पाहणं तितकंच महत्वाचं आहे. त्यासाठी, विकासाच्या महत्वाच्या टप्प्यांची माहिती घेणं आवश्यक आहे. हे टप्पे गाठले जाण्याची एक सामान्य पातळी आहे आणि त्यामुळं प्रत्येक मुलांत ती वेगवेगळी असते. आरोग्य सेवकांनी वाढ आणि ट्प्प्यांची नोंद ठेवलीच पाहिजे म्हणजे, मुलांमधे चांगल्या सवयी लागाव्यात याकरता त्यांना मार्गदर्शन करता येईल.
मुलांची वाढ आणि विकास यांच्यावर विविध घटकांचा प्रभाव पडतो. त्यामधेः अनुवंशिक परंपरा, वय, लिंग, बाळाच्या जन्मानंतर त्याचं आणि मातेचं पोषण, घरातील चांगल्या सोयी, सूर्यप्रकाश, सुरक्षित पाणी-पुरवठा, संक्रमणाला प्रतिंबंध आणि त्यावर नियंत्रण, कुटुंबाचा आकार, जन्मक्रम आणि दोन मुलातलं अंतर, गर्भधारणेदरम्यान घेतलेली काळजी इत्यादी. यापैकी बहुतांश घटकांवर, कुंटुंबाची आणि विशेषतः मातेची सामाजिक-आर्थिक स्थिती यांचा थेट प्रभाव पडतो. सामान्य विकास आणि वाढीला चालना देण्यासाठी हे सर्व घटक लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
Comments
Post a Comment