Sunday, October 20, 2024

पौगंडावस्था

 माणसाची वाढ व विकास हे जन्मापासून (त्याही आधी गर्भधारणेपासून) सुरू असले तरी त्यांच्या भ्रूण, बाळ/नवजात अर्भक, शिशु, बालक, कुमार, किशोर, तरुण, प्रौढ, वृद्ध, इत्यादी अनेक टप्प्यांपैकी दहाव्या वर्षापासून सोळा ते वीस वर्षांपर्यंतच्या संक्रमणाच्या कालखंडाला किशोरवय म्हणतात. या कालखंडात अपरिपक्व मुलाचे (कुमाराचे) पूर्ण शारीरिक वाढ झालेल्या व मानसिक-सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ तरुणात रूपांतर होते. याच वयात होणाऱ्या माणसाच्या लैंगिक वाढ व विकासाच्या टप्प्याला पौगंडावस्था म्हणतात.

पौगंडावस्था (Puberty[]) हा लैंगिक संक्रमणाचा कालखंड आहे. सर्वसाधारणपणे मुलीत या कालखंडाची सुरुवात वयाच्या 10 ते 11व्या वर्षी होते आणि 15 ते 17व्या वर्षापर्यंत लैंगिक विकास पूर्ण होऊन हा कालखंड संपतो. वयाच्या 12 ते 13व्या वर्षी पहिली [मासिक पाळी] येणे हा या कालखंडातील महत्त्वाचा टप्पा होय. मुलात या कालखंडाची सुरुवात थोडी उशीरा, वयाच्या 11 ते 12व्या वर्षी होते आणि 16 ते 18व्या वर्षापर्यंत हा कालखंड संपतो. त्यामधे वयाच्या 13व्या वर्षाच्या सुमाराला पहिले वीर्यस्खलन होणे हा या कालखंडातील महत्त्वाचा टप्पा आहे.

मेंदूकडून प्रजनन ग्रंथींकडे विशिष्ट वयात येणाऱ्या संप्रेरकांच्या स्वरूपातील संदेशांमुळे पौगंडावस्थेची सुरुवात होते. या संदेशांमुळे मुलामधे वृषणाची आणि मुलीमधे बीजांडकोषाची वाढ होते. मुलामधे वृषणातून टेस्टोस्टेरॉन व मुलीमधे बीजांडकोषातून ईस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या अंतःस्रावांची निर्मिती सुरू होते. त्यांच्या प्रभावामुळे मुलात शुक्रजंतू व वीर्य निर्मिती आणि मुलीत स्त्रीबीज निर्मिती व मासिक पाळी सुरू होणे ही लैंगिक कार्ये सुरू होतात. मुलामधे शिश्नाची व मुलीमधे गर्भाशय व योनीमार्गाची वाढ होते. त्याचबरोबर फार शारीरिक फरक नसलेल्या मुलात मुलगा व मुलगी असे स्पष्ट बाह्य भेद दाखवणारी, बाह्य जननेंद्रियांवर केस उगवणे, मुलाचा आवाज फुटणे, दाढी-मिशा उगवणे, इत्यादी आणि मुलीमधे स्तनांची वाढ होणे, शरीराला गोलवा येणे, इत्यादी चिन्हेही दिसू लागतात. त्यांना दुय्यम लैंगिक चिन्हे असे म्हणतात.

हे सर्व होत असतानाच, लैंगिक जाणीवा विकसित होणे, लैंगिक भावना मनात येणे, लैंगिक आकर्षण निर्माण होणे, असे मानसिक आणि वैचारिक बदलही होत असतात.

या सर्वांचा परिणाम म्हणून या टप्प्याच्या शेवटी मुलगा आणि मुलगी अनुक्रमे पुरुष आणि स्त्रीमधे लैंगिकदृष्ट्या विकसित होऊन प्रजननक्षम बनतात.

इंग्रजीत प्युबर्टी (Puberty) हा शब्द लॅटीनमधील "प्युबेस' या शब्दावरून आला आहे. प्युबेस म्हणजे जननेंद्रियावरील केस. हे केस उगवू लागले की व्यक्ती वयात आली असं पूर्वी मानण्यात येत असे.

किशोरवय हा मुख्यतः मानसिक-सामाजिक परिपक्वतेचा काळ आहे. पौगंडावस्था आणि किशोरवय हे दोन्ही कालखंड काही काळ एकमेकांबरोबर समांतर जात असले तरी किशोरवयाचा वैशिष्ट्यपूर्ण कालखंड जास्त पसरट असून त्याची व्याप्ती शारीरिक-बौद्धिक-मानसिक-समाजिक अशी सर्वसमावेशक आहे. त्यातील बौद्धिक-मानसिक-समाजिक परिपक्वतेची प्रक्रिया पुढे तारुण्यात व प्रौढावस्थेतही चालू राहाते. पौगंडावस्था हा त्यातील फक्त लैंगिक संक्रमणाचा कालखंड असून लैंगिक विकास पूर्ण होऊन प्रजननक्षमता आल्यावर तो संपतो.

No comments:

Post a Comment

मान दुखत असल्यास झोप कशी घ्यावी?

                                                         मान दुखत असल्यास झोप कशी घ्यावी? मानेचा त्रास तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू शकत नाह...