मनुष्यप्राण्यात स्तन लैंगिक उद्दीपनात महत्त्वाचे काम करतात. हे महत्त्व दोन प्रकारे आहे. एक म्हणजे पुरुष आणि स्त्रीच्या शरीरावरील अनेक लैंगिक उद्दीपक क्षेत्रांपैकी ते एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. त्यांना केलेल्या स्पर्षामुळे त्या व्यक्तीचे शारीरिक पातळीवर कामोद्दीपन होते. दुसरे म्हणजे स्त्रीचे स्तन दिसणे किंवा त्यांचा स्पर्ष पुरुषाला आणि विशिष्ठ पुरुषाने ते बघणे स्त्रीला कामोद्दीपक वाटते. पुरुषाची उघडी, भरदार आणि केसाळ छाती आणि त्यावरील स्तनाग्रे बघणे स्त्रीलाही कामोद्दीपक वाटते. हे कामोद्दीपन मानसिक पातळीवर होते[७]. मनुष्यप्राण्याच्या बाबतीत लैंगिकता प्रामुख्याने मानसिक पातळीवरील असल्याने हे महत्त्वाचे आहे.
स्तनाग्रे आणि त्याभोवतालची चकती यांवरील त्वचा चेतातंतूंनी समृद्ध असते. त्यामधे चेतातंतूंचे दाब आणि थरथरीला संवेदनक्षम पापुद्रेयुक्त गोलक; स्पर्षसंवेदक गोलक; जननेंद्रियांवर आढळणारे वैशिष्ट्यपूर्ण तापमानसंवेदक गोलक आणि काही सुसंघटित चेतातंतूंची टोकेही विखुरलेली आढळतात.
दुधाच्या ग्रंथी, नलिका आणि त्याभोवतीच्या अनैच्छिक स्नायूंभोवतीही चेतातंतू एकवटलेले आढळतात. स्तनाग्राभोवतालच्या चकतीजवळच्या केसांची मुळेही या संवेदनक्षमतेत भर घालतात. संपूर्ण स्तनामधेही दाब आणि वेदनेला संवेदनक्षम चेतातंतूंच्या टोकांचे जाळे आढळते.
जननेंद्रीयांपासून जाणाऱ्या संवेदना मेंदूच्या ज्या क्षेत्रात पोचतात त्याच क्षेत्रात स्तनाग्रांपासून निघालेल्या संवेदना पोचतात. याशिवाय स्तनाग्रांना उत्तेजित केल्यावर ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टीन या हॉर्मोन्सच्या निर्मितीत झपाट्यानं वाढ होते. त्यामुळे गर्भाशयाच्या आकुंचन-प्रसरणाला चालना मिळते. ही एक प्रतिक्षिप्त क्रियाच आहे. या आकुंचनांची संवेदनाही मेंदूत त्याच क्षेत्रात पोचते.
पुरुष आणि स्त्री, दोघांतही याचा जननेंद्रीयांवर मोठा परिणाम होतो. छाती, स्तन, स्तनाग्रे आणि त्याभोवतालची चकती यांना स्पर्षाने उत्तेजित केल्यावर दोघांतही एक प्रकारची कामोत्तेजक आणि सुखद भावना निर्माण होते[८]. त्याचबरोबर हात, बोटे, ओठ, जीभ, इत्यादी इतर कामोत्तेजक क्षेत्रांना स्तनांचा स्पर्ष झाल्यासही सुखद भावना निर्माण होते.
याप्रमाणे स्तन कामभावनेने उत्तेजित झाले असताना त्यांचा रक्तपुरवठा वाढतो, त्यामुळे त्यांच्या आकारमानात थोडी वाढ होते, त्यावरील शिरा दिसू लागतात, ते थोडे जास्त गरम होतात आणि स्तनाग्रे मोठी होऊन पुढे येतात आणि जास्त टचटचीत होतात.तसेच लैंगिक संबंधाच्या वेळी स्तन आणि स्तनाग्रे स्पर्षानं उत्तेजित केल्याने जननेंद्रीयेही संभोगासाठी तयार व्हायला मदत होते. काही व्यक्तींत तर केवळ स्तनाग्रांच्या उद्दीपनामुळे संतृप्तीची भावनासुद्धा येते.
यामुळे स्तन हा शारीरिक कामोत्तेजक क्षेत्रांपैकी एक महत्त्वाचा अवयव आहे.
पुरुषांच्या बाबतीत स्त्रीचे स्तन दिसणे किंवा त्यांचा स्पर्षही पुरुषांना कामोद्दीपक वाटतो. यामागे उत्क्रांतीजन्य, शारीरिक आणि मानसिक कारणांबरोबरच अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कारणेही आहेत. हे उद्दीपन स्तनांच्या आकारावर अवलंबून असू शकते[९]. पण स्त्रीयांचे बाबतीत उद्दीपन आकारावर अवलंबून नसते.
पण सामाजिक परीस्थितीत स्त्री-पुरुष इतर अनेक कारणांनी एकत्र येण्याची परीस्थिती निर्माण झाल्यावर असे कामोत्तेजन होणे परवडणारे नाही आणि योग्यही नाही. म्हणून सामाजिक परीस्थितीत स्तन दिसण्यावर आणि एकूणच नग्नतेवर जास्त बंधने येत गेलेली दिसतात. त्यांतही, स्त्री लैंगिक दृष्टीने आणि एकूणच जास्त असुरक्षित आहे अशा समाजांत आणि संस्कृतींत ही बंधने जास्त जास्त कडक असलेली आढळतात.
No comments:
Post a Comment