महिला आरोग्य प्रबोधन ही काळाची गरज
संपूर्ण राष्ट्रीय आरोग्याचा विचार करता महिलांचे आरोग्य या घटकाला त्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. हे नाकारून चालणार नाही. या देशातील महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होऊ शकेल. आज आपल्या देशातील महिलांचे आरोग्य ही चिंतेची आणि चिंतनाची बाब बनली आहे. या महिलांचा विकास लहानपणापासूनच व्हायला हवा. तिच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची जपणूक होणे आवश्यक आहे.
बालपणी मिळणारा योग्य तो पोषक आहार या महिलेचे पुढील आयुष्य व आरोग्य ठरवत असतो. आज जी कुपोषणाची समस्या संपूर्ण देशाला भेडसावत आहे, त्यातून महिलांची सुटका झालेली नाही. अगदी गर्भिणी अवस्थेतील महिलेचेच उदाहरण घेतले तरी गर्भारपणी तिचे होणारे पोषण हे योग्य तेवढे होताना दिसत नाही. विशेषत: ग्रामीण आणि वनवासी क्षेत्रातील गर्भिणींची स्थिती तर खुपच हलाखीची आहे. आपल्या देशात होणार्या एकूण प्रसूस्तीपैकी 67 टक्के प्रसूती या सुईणींकडून घरच्याघरी होतात. तिथे त्या महिलांना कोणतेही डॉक्टरी साहाय्य उपलब्ध होत नाही. असे संख्याशास्त्र सांगते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 60 वर्षांनी ही स्थिती किती दुर्दैवी आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. स्त्री भू्रणहत्येचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले असल्याने गर्भ लिंग चाचणींवरही प्रतिबंध आणावा लागला. तरीही हे सर्व थांबले आहे का, हा खरा प्रश्न आहे.
गर्भाचे नीट पोषण झाले नाही तर जन्माला येणारी बालिकाही कमी वजनाची आणि कुपोषित अशीच जन्माला येणार. तिची आईदेखील कुपोषित असली तर त्यामातेचे दूध नवजात बालिकेला नीट मिळत नाही. मग या बालिकेची पूर्ण वाढ कशी होणार? तिच्या शरीराची प्रतिकार शक्ती कशी विकसित होणार? गर्भाचे नीट पोषण न होणे, पुढे मातेचे दूध योग्य तेवढे न मिळणे, बालिका थोडी मोठी झाली की तिच्या शरीराच्या वाढीला आवश्यक असणारा योग्य तेवढा आहार न मिळणे यामुळे बालपणी ती बालिका खुरटलेली राहते. मग तारुण्यावस्थेत पदार्पण केल्यावर तिच्यामध्ये काय सुधारणा दिसणार?
हे सर्व थांबवायचे असेल तर महिलांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्याच्या आरोग्याविषयी जागृती निर्माण करावी लागेल. घरातील गृहिणींचे आरोग्य जर उत्तम असेल तर ती इतरांकडे नीटपणे लक्ष देऊ शकते; परंतु तिच स्वत: काही समस्यांनी बेजार झाली तर संपूर्ण कुटुंबच अवस्थ होते. हा सर्वांचाच अनुभव आहे. महिलांची मानसिकता बर्याचदा रोग अंगावर काढण्याची असते. तो बळावला तरच त्या वैद्यकीय सल्ला घेण्यास तयार होतात. त्याही दृष्टीने त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. गर्भिणी अवस्थेतही महिलेचे उत्तम पोषण होण्यासाठी ग्रामीण भागात अंगणवाड्यांमधून मिळणारा आहार विशेषत: गायीच्या तुपाने युक्त असावा. तो ठरवताना भारतीय आहार शास्त्राचे सिद्धांत विचारात घ्यावेत. आपले सरकार गेली 50 वर्षे महिलांमध्ये लोहाच्या आणि कॅलशियमच्या गोळ्या वाटते आहे, पण त्याचा काही उपयोग झाल्याचे दिसून येत नाही.
त्यामुळे मुळात महिलेचा असणारा आहार आणि विहार या संदर्भात सर्व स्तरावर तिचे प्राबोधन होणे गरजेचे आहे.
सरकारलाही भारतीय आहार शास्त्राचे सिद्धांत विचारात घ्यावे लागतील. त्यानुसार अंगणवाड्यांमधून योग्य आहार पुरवावा लागेल. महिलांमध्ये स्थूलतेचेही प्रमाण चिंताजनक आहे. महिलांनी उपवास कमीत कमी करावेत यासाठीही त्यांचे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. योग्य तेवढा व्यायाम, योगासने करण्याचीही गरज महिलांना असते. हे त्यांनी विचारात घ्यायला हवे. मनाचे आरोग्य जपण्यासाठीही आवश्यक ते सर्व प्रयत्न महिलांनी करावेत. शतावरी ज्येष्ठमध, चंदन, भुईकोहळा, कोरपड, आवळा अशा काही वनौषधी महिलांनी नेहमी बाळगाव्यात आणि त्यांचा योग्य तो उपयोगही करावा. या वनौषधी सहज उपलब्ध होणार्या अशा आहेत. खजूर, अंजीर, केळी, द्राक्षे, डाळिंब अशा काही फळांचा उपयोग त्यांनी आहारात ठेवावा.
बाजरीची भाकरी आणि शरीराला आवश्यक असणार्या योग्य भाज्यांचा समावेश आहारात महिलांनी करावा. आरोग्यात काही बिघाड झाल्यास लवकर वैद्यकीय सल्ला घ्यावा. आयुर्वेद या भारतीय वैद्यकाने सांगितलेली गर्भिणी परिचर्या त्या अवस्थेत अवश्य पाळावी, म्हणजे पुढील समस्याही टाळता येऊ शकतील. या सर्व बाबींचे योग्य रीतीने पालन करण्याचा निश्चिय जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांनी केल्यास त्यांना चांगले आरोग्य लाभेल. या महिलांचे आरोग्य हिच खरी राष्ट्राची संपत्ती आहे.
No comments:
Post a Comment